२०११ ते २०१८ या काळात 'छात्र प्रबोधन' मासिकात लिहिलेल्या विज्ञानकथा 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' या पुस्तकात संग्रहित केल्या आहेत.
६ एप्रिल २०१९ रोजी 'अक्षर मानव'च्या संवाद सहवास उपक्रमात या पुस्तकाचं लोकार्पण प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झालं; तर 'फ्रेंड्स लायब्ररी'च्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात प्रसिद्ध अर्थतज्ञ व लेखक चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते १३ एप्रिल २०१९ रोजी पुस्तकाचं प्रकाशन झालं.
'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' या कथासंग्रहात एकूण ९ कथा आहेत. सायबर टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पिझो क्रिस्टल, कालप्रवास अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या या कथा आहेत. पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे कुमार, किशोर व तरुण वयोगटातील वाचकांनी ह्या कथा वाचाव्याच, पण प्रौढांनी वाचल्या तरी ज्ञान आणि आनंद मिळेल.
'चित्राक्षरे' या पोर्टलवर भारत निलख यांनी लिहिलेला पुस्तक परिचय-
विज्ञान कथा अजूनपर्यंत कधीच वाचल्या नव्हत्या. अर्थात आपला एक कल असतो त्यानुसार आपण वाचत जातो. मागील आठवड्यात 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा क्षितीज देसाई लिखित कथासंग्रह वाचला आणि आपण आपल्या कलाच्या पलिकडे जाणं हे ही किती आनंददायी असू शकतं हे समजलं!
नवोदितांचं वाचण्यात इंटरेस्ट असतो. पुस्तकाचं नावही इंटरेस्टिंग आणि कुतूहल चाळवणारं वाटलं. कथासंग्रह मागवला आणि वाचायला सुरुवात केली तर वाचतंच गेलो. हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता.
पहिलीच शीर्षक कथा मला भन्नाट आवडली! ही काही हजार वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आहे. एका स्वप्नाळू आणि धडपड्या तरूणाची ही गोष्ट. यातला निवेदक त्याकाळातील एक छोटा मुलगा आहे. त्या काळातील भाषा अर्थात वेगळी असणार मग लेखकाने वर्तमानातल्या वाचकाला समोर ठेऊन परंतू त्या काळालाही न्याय देऊन जे शब्द बनवले आहेत ते खास आहेत. त्यासाठीची लेखकाची मेहनत दिसून येते. कथानक सुंदर आहे!
पुढच्या 'बोका बोले तो', 'तुझो माझो पिझो', गळ्यात साखळी सोन्याची', चोराच्या मनात चेक इन' चार कथा या विज्ञान कथा आणि शोध कथा यांचं मिश्रण आहे. एक तरुण पोलीस आणि त्याला मदत करणारी कॉलेज तरूणी, हे दोघे मिळून गावातील वेगवेगळ्या चोर्या करणार्या चोरांना कशाप्रकारे पकडतात? असं कथानक आहे. 'माझा पॅराडॉक्स' ही कथा टाईम ट्रॅव्हल या कन्सेप्ट वर आधारित आहे. कथेचा प्लॉट मस्त आहे. मला ही कथा वाचताना डार्क या सिरीजची आठवण आली. 'म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे' या कथेत थ्रिल हा एलिमेंट आहे! वाघांवर प्रयोग करणारा एक संशोधक साथी संशोधकाचा सूड घेण्यासाठी कोणत्या थराला जातो आणि त्यातून कोणतं संकट उभं राहतं हे या कथेत येतं. 'काळ थांबत नाही' याचं कथाबीज खूप छान आहे. भुतकाळात जाऊन एका संशोधकाच्या धारणा तो संशोधक होण्याआधीच बदलायच्या आणि त्याला त्याच्या संशोधनापासून दूर ठेवायचं यासाठी एक तरुण आणि तरुणी प्रयत्नशील आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो का? हे कथा वाचल्यावर समजेल. शेवटच्या 'माय' भुमी या कथेत पृथ्वीचं भविष्य आणि त्या अनुषंगाने घडणारी स्थित्यंतरं आणि एका तरुण संशोधिकेने तिच्या आयुष्यात यासंदर्भात घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असं कथानक आहे.
यातील आठही कथा लघुकथा आहेत. कथा सुटसुटीत, समजायला सोप्या आहेत. परंतू त्या कंटाळवाण्या होत नाहीत. प्रसंग, संवाद हे अटोपशीर आहेत. भाषा साधी सिंपल पण वाचणार्याला एंगेज ठेवणारी आहे. कथानकं अधिक गुंतागुंतीची असती तर आणखी मजा आली असती असं वाटलं.
मानवी आयुष्यातील विज्ञानाचं महत्त्व या कथांमधून अधोरेखित झालं आहे. पहिलीच कथा विज्ञानामुळे मानव कसा 'पुढे गेला' हे मांडते. इतर कथांमध्ये माणूस त्याच्या विवेकानुसार विज्ञानचा वापर कसा चांगल्या वाईट प्रकारे करू शकतो/करतो ते दिसतं त्याचबरोबर निसर्ग, पर्यावरण यांच्या संवर्धनाचं भान शेवटच्या कथेत दिसतं!
विज्ञान कथा म्हणून या कथांची गुणवत्ता काय आहे हे मी सांगू शकत नाही. या प्रामुख्याने किशोरवयीन मुलांना समोर ठेऊन लिहिल्या आहेत. पण ब्लर्ब वर म्हंटल्याप्रमाणे या कथा प्रौढांनी वाचल्या तरी ज्ञान आणि आनंद हमखास मिळेल. माझ्याही बाबतीत हेच झालं आहे!
भारत निलख