कवयित्री, समीक्षक प्रा. प्रतिभा सराफ यांनी केलेले 'ललित' मासिकातील परीक्षण. (ललित, ऑक्टोबर २०२६)
कवयित्री, समीक्षक प्रा. प्रतिभा सराफ यांनी केलेले 'ललित' मासिकातील परीक्षण. (ललित, ऑक्टोबर २०२६)
ज्येष्ठ लेखक डॉ. संजय जोशी यांनी दै. नवशक्ती येथे केलेले परीक्षण. (दैनिक नवशक्ती, २८ डिसेंबर २०२५)
लेखिका अश्विनी निवर्गी यांनी दै. नंदीग्राम येथे केलेले परीक्षण. (दैनिक नंदीग्राम, २ जुलै २०२६)
दैनिक नवशक्ती | २८ डिसेंबर २०२५
‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’ : उत्कंठावर्धक विज्ञानकथांचा संग्रह
विज्ञानकथा हा साहित्यप्रकार पाश्चिमात्य साहित्यात साधारणपणे अठराव्या शतकात अस्तित्वात आला. मराठीत विज्ञान कथा लेखन साधारण १९५० च्या दशकात सुरू झाले. सत्तर दशकाच्या मध्याला विज्ञानकथेच्या दृष्टीने विशेष अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. माध्यमिक शिक्षणात विज्ञानाला मिळालेले महत्त्व, हे ह्या अनुकूल परिस्थितीचे एक कारण होते. दूरचित्रवाणीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आणि त्यावरील विज्ञानकथात्मक कार्यक्रमांच्या लोकप्रियतेचाही ह्या संदर्भात उल्लेख करता येईल. याच दरम्यान मराठी विज्ञान परिषेदेने दरवर्षी विज्ञान कथालेखनाची स्पर्धा सुरू केली हेही एक महत्त्वाचे कारण विज्ञान कथालेखनाच्या प्रसारासाठी पोषक ठरले. जयंत नारळीकर ह्यांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलीय भौतिकी विज्ञानकथा लिहू लागल्यामुळे ह्या लेखन प्रकाराला मराठीत एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांनीही त्यांच्या अतिशय रंजक शैलीतील कथांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विज्ञानातील विविध संकल्पना पोहोचवण्याचे मोलाचे काम केले आहे आणि अजूनही करत आहेत. या व्यतिरिक्त लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डी. व्ही. जहागीरदार, विश्वेश्वर सावदेकर, शुभदा गोगटे, अरूण मांडे, जी. के. जोशी, मेघश्री दळवी, बिपीन देशमाने, सुनील विभुते असे अनेक लेखक उत्तम विज्ञानकथा लिहीत आहेत.
या यादीत आता आश्वासक भर पडली आहे ती क्षितिज देसाई या तरुण लेखकाची. त्यांचा 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' हा नवाकोरा विज्ञान कथासंग्रह ठाण्यातील 'सृजनसंवाद प्रकाशन'तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. लेखक क्षितिज देसाई हे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत. म्हणजेच त्यांना विज्ञानाची एक शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. त्यांचा हा कथासंग्रह वाचकाला एका अद्भुत विश्वाची सफर घडवून आणतो.
या संग्रहात एकूण आठ वेगवेगळ्या आशयांच्या कथा आहेत. यातील 'ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट' या पहिल्याच कथेतली नायिका मंगळ ग्रहावर कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंत्राटदाराचे भ्रष्ट व्यवहार चतुराईने उघडकीस आणते. असे असले तरी लेखक वाचकाला शेवटाकडे चकीत करतो. 'ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड' या कथेत सरकारातील चार प्रमुख मंत्र्यांचे दहशतवाद्यांकडून होणारे संभाव्य अपहरण टाळण्यासाठी त्या मंत्र्यांचे ‘क्लोन्स’ म्हणून यंत्रमानवांच्या चार हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या जातात आणि त्यांना अंतराळात पाठवण्यात येते. त्यांचे पुढे अपहरण होते की नाही... वगैरे भाग कथेत रंजकपणे वर्णन केला आहे. या कथेत त्यांनी ‘कलेक्टिव्ह कॉन्शनेस’ या संकल्पनेचा आधार घेतला आहे. कोव्हिडच्या साथीचा संदर्भ घेऊन 'इंडेक्स पेशंट' नावाची भन्नाट कथा या संग्रहात समाविष्ट आहे. जी वाचतान वाचक टाईमलाईनमधून नकळतपणे प्रवास करतो.
कथासंग्रहातील शीर्षक कथा 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' ही मानवाला आपले तारुण्य चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘क्रायोजेनेसीस’ या तंत्रज्ञानावर आधारित अतिशय रंजक कथा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही विकसित झाली तरीही मानवीय भावभावनांना समजणे व त्यातील बदलांचे अचूक आकलन होणे अवघड असल्याचे ही कथा वाचताना जाणवते.
आध्यात्माचा देखावा रचून भाविकांना आभासी दुनियेत नेणाऱ्या साधूचा पर्दाफाश विज्ञानाच्या साहाय्याने कसा होतो हे 'देही देवाचा वास' या कथेत लेखकाने शिताफिने उलगडून दाखवले आहे. तर 'रपबोनॅप' या कथेत एका कंपनीचा सुरक्षारक्षक तिथले यंत्रमानव चोरून नेतो आणि त्यांना परत करण्यासाठी खंडणीची मागणी करतो याचे रंजक वर्णन आहे. आत्ताच्या आधुनिक युगात विकसित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित कथादेखील रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. 'बुद्धी आणि बळ' या शेवटच्या कथेत बुद्धिबळाच्या खेळाला तंत्रज्ञानाची जोड देत प्रतिस्पर्ध्याच्या चाली ओळखण्याच्या स्मार्टनेसचा गैरवापर दर्शवला असला तरी अखेर विजय सत्याचाच होतो हेही लेखकाने त्यात बिंबवले आहे.
विख्यात विज्ञान कथालेखक ह्युगो झेबाक यांच्या मते, 'विज्ञान कथेला वैज्ञानिक सत्याचे अधिष्ठान तर हवेच, पण त्याचबरोबर त्या लेखकाला कल्पनेच्या आधारे भविष्यकाळाचा अचूक वेधही घेता आला पाहिजे. विज्ञान कथा वाचकाच्या मनाची पकड घेणारी असली पाहिजे, पण त्याचबरोबर रोचक स्वरूपात ज्ञान देणारी आणि प्रबोधनपर असली पाहिजे.' क्षितिज देसाई यांचा 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' हा कथासंग्रह या कसोटीवर खरा ठरतो.
पुस्तक निर्मितीच्या बाबतीत तडजोड न करण्याचा आग्रह 'सृजनसंवाद प्रकाशन'चे संपादक गीतेश शिंदे यांचा नेहमीच असतो. उत्तम छपाई, बांधणी व व्याकरणदृष्ट्या निर्दोषत्वास हेही पुस्तक अपवाद नाही. सरदार जाधव यांनी सर्व कथांना साकारलेली समपर्क रेखाचित्रे व मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. ज्येष्ठ विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांनी या पुस्तकाची ‘पाठराखण’ केली असून युवा लेखक क्षितिज देसाई यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असल्याचे त्यातून जाणवते.
डॉ. संजय जोशी
पुस्तकप्रेमी समूह | २३ जून २०२६
मला रहस्यकथा वाचायला आवडतात. हेरकथाही वाचायला आवडतात. पण ह्या साय-फाय कथा वाचताना जीव जरा घाबरतो…अकल्पिताला असं सामोरं जाताना. तुम्हाला हसू येईल कदाचित पण मनातलं सांगतेच ह्या पुस्तक परिचयाच्या निमित्ताने... ह्या अशा विज्ञानकथा वाचताना मला माझ्या आजूबाजूला निळसर जांभळट वातावरण जाणवते. अत्यंत गार असं काही शरीरात शिरत रहातं. सूर्याच्या तजेल्यापासून दूर कुठेतरी शांत स्तब्ध वातावरणात आल्यासारखं वाटतं. हे सगळे माझे मनोव्यापार आहेत म्हणा.
माझी/ आपली पिढी अशी आहे, ज्यांनी सगळी अवघड लेजर्स आकडेमोड करून हाताने लिहिली आहेत. तातडीची बातमी सांगायला तार केली आहे. ट्रँक कॉल केला आहे. टाईपरायटरवर टाईप केलं आहे. कॅल्क्युलेटर वापरणं म्हणजे अगदी गणित येत नाही असं समजलं जाईल अशा वातावरणात वाढलो आहोत. आणि अगदी अफाट वेगाने गणित करणाऱ्या महासंगणकाचादेखील उपयोग पाहिला आहे. रेकॉर्ड प्लेयर ते आजचं डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार झालेलं संगीत ह्या सगळ्याला आपण साक्ष आहोत. अफाट वैज्ञानिक प्रगती आपण पाहिली. *वोल्गा ते गंगा* हे राहुल सांस्कृत्यायन ह्यांचं पुस्तक वाचताना मनात येत होतं आदिम काळात गुहेत राहणाऱ्या माणसाला वाटलं तरी असेल का की एकदिवस त्याचे वंशज थेट चंद्रावर जाणार आहेत. मंगळावर वसाहत करण्याचे स्वप्न बघणार आहेत. पण एक सांगू का, वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी माणसाच्या जगण्यातले षडरिपू काही बदलत नाहीत. अगदी गुहेत राहिला तरी नि अगदी मंगळावर राहिला तरी.
*शीतपेटीतून जेव्हा जाग येते* ह्या पुस्तकाचे लेखक क्षितिज देसाई हे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे लेखक आहेत. ह्या पुस्तकात एकापेक्षा एक सरस अशा आठ विज्ञान कथा आहेत. क्षितिज देसाई म्हंणजे एक तल्लख बुद्धीचा, चतुर, चाणाक्ष लेखक आहे. त्याची लेखनशैली सुटसुटीत आणि आटोपशीर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कथा उगीचच लांबत नाहीत. एका धक्कातंत्राचा ह्यात प्रयोग आहे... हा असा प्रयोग असणार, हे माहीत असतानाही आपण त्या कथेत गुंगून जातो, उत्सुक असतो, चकित होतो. विज्ञान कथा लिहायच्या म्हणजे सोपं काम नाही. ते देखील मराठीमधून. आधी आपल्याला वैज्ञानिक संकल्पना नीट माहीत हव्यात. त्यानंतर कथेमध्ये कशा चपखल बसवता येतील हे माहीत हवे.
क्षितिजने लिहिलेल्या कथा सकारात्मक आहेत. 'शेवटी दुष्ट प्रवृत्तीचा नाश होतो... ' अशा जडण घडणीत घडलेल्या मला ह्या कथा वाचताना मनापासून आनंद झाला. खरं सांगते,ब्योमकेश बक्षीसारखी एखादी व्यक्तिरेखा तयार करून क्षितिजने ओ टी टी साठी मस्त वैज्ञानिक कथांची सिरीज लिहावी. नक्कीच खूप रंजक असेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी हवे ते परिणामसुद्धा साधता येतील.
ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मोठे सूचक आहे. त्यातल्या मनुष्याकृतीला चेहरा नाही, हातात मुखवटा आहे, बार कोड आहे, एक कायम राहिलेली गोष्ट म्हणजे finger print ... अशीच ओळख राहणार का मनुष्याची भविष्यात ...? असा प्रश्न मला पडला. त्यातल्या एक दोन कथांची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
*ब्लु बेरीचं ब्रेसलेट* ही कथा म्हणजे झकास कल्पनाविलास आहे. भास आणि आभास ह्यांची सीमारेषा कुठून सुरु होते नि कुठे संपते ह्या विचारात वाचकांना गुंगवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. मंगळावर पोस्टिंग व्हावी म्हणून परीक्षा देणाऱ्या तरुणीला आलेला थरारक अनुभव आपणही अनुभवतो.
*शीतपेटीतून जाग येताना* ही कथा वाचताना लक्षात आलं की ह्या प्रकारची व्यवस्था आता सुरु झाली आहे की! करियर किंवा तत्सम कारणांसाठी स्त्रिया , पुरुष आपले बीज /अंडं / शुक्राणू गोठवून ठेवतात. त्यांना योग्य वेळ आली आहे असे वाटल्यावर मुलाला जन्म देऊ शकतात. प्रयोगशाळेत फलन करून मग कदाचित सरोगसी देखील केली जाऊ शकते. मग ह्या कथेत शीतपेटीत राहिलेल्या व्यक्तीला शीतपेटीतून बाहेर आल्यावर कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं...? त्या व्यक्तीला नुकसानभरपाई मिळते का? शेवटी त्या व्यक्तीचे बुद्धी चातुर्य सगळ्या सिस्टिमला कसे भारी पडते हे वाचताना मला खूप धमाल आली. त्याचवेळेस लक्षात आलं की कितीतरी वैद्यकीय उपचारांदरम्यान आपण आपली संमती म्हणून सह्या करत असतो. एक तर त्यावेळेस आपली मनस्थिती संतुलित नसते नि वाद घालण्यासाठी / काथ्याकूट करण्यासाठी वेळ नसतो. पण अशा काही अटी आपल्याला पुढे कुठलीही कारवाई करण्यापासून परावृत्त करत असतात हे लक्षात येत नाही.
*ओरिगामीचे ओबडधोबड ऑर्किड* ही कथा वाचताना ह्या कथेतल्या यंत्रमानवाबद्दल तो यंत्रमानव असला तरी त्याबद्दल कणव वाटल्याखेरीज राहवत नाही. एक हलकासा मानव्याच्या स्पर्श ह्या यंत्रमानवांना लेखकाने दिला आहे.
*इंडेक्स पेशंट* ह्या कथेत टाईम मशीन ही संकल्पना येते. मलासुद्धा ह्या टाईम मशीन मध्ये जाऊन एकदातरी त्या शिवरायांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती कपाळाला लावावी, जमल्यास तानाजीला मदत करून त्याला रायबाच्या लग्नासाठी परत आणावं असं वाटून गेलं. पण काळाच्या अमर्याद चक्रात सुईएवढी गोष्टीदेखील आपण हलवली तर त्याचे विपरीत परिणाम होतात हे भान मनात जागे आहेच.
एका काळातून दुसऱ्या काळात जाऊन सध्याचा वर्तमानकाळ बदलण्याचा प्रयत्न करणारी एक सिरीज नेटफ्लिक्सवर पाहिली होती outlander नावाची. वर्तमानकाळातून असे भूतकाळात जाणे थरारक होते. तसाच काहीसा परिणाम इंडेक्स पेशंट ह्या कथेत वाचकांना जाणवतो.
*इंडेक्स पेशंट* ह्या कथेत तत्कालीन संदर्भ घेत लेखकाने वेगवान कथा लिहिली आहे. टेम्पोरल डिस्टोर्शन, टाईम पॅराडॉक्स अशा शब्दांशी आणि त्यानुसार येणाऱ्या संदर्भांशी ओळख झाली. मराठीत ह्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर कालिक विपर्यास / विरूपण / विकृती असे अर्थ समोर आले. काळाच्या साम्राज्यात शिरून जे घडून गेले ते बदलण्याचा अट्टाहास म्हणजे विपर्यास ... विकृती...हा अर्थ ह्या शब्दातून सूचित होतोय.
ह्या सगळ्याच कथांमधून प्रचंड कल्पनाशक्ती दिसते. त्या त्या काळाला अनुरूप साधने/ संसाधने, नवीन कालसापेक्ष शब्दनिर्मिती मोठ्या कल्पकतेने केली आहे. म्हणजे इथे अधिकृत / अनधिकृत कालप्रवास आहे. एअर हायवे, एअर कार आहे. अत्यंत तलम नि हलक्या पदार्थाचा वापर करून तयार केलेला नॅनो सूट आहे. न्यायालयात न्यायमूर्तींऐवजी ‘न्यायाधीश स्क्रीन’ आहे. AI ची मदत घेऊन सगळी मार्गदर्शक तत्त्व, कायद्याची कलमं त्याला फीड केलेली आहेत. त्यामुळे वेगाने न्यायप्रक्रिया होत आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. हल्ली ज्या वेगाने AI सगळी क्षेत्रं व्यापत आहे त्या वेगाने लेखकाने पुस्तकात लिहिल्याप्रमाणे *न्यायाधीश स्क्रीन* कदाचित लवकरच प्रत्यक्षात येतील असं वाटतंय. आमच्या बांधकाम क्षेत्रात AI ने मोठी आघाडी घेतली आहे. इमारती साठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेताना AutoDCR ही प्रणाली आता कुठलीही योजना सबमिट केली की त्याची प्राथमिक तपासणी / scrutiny करणार आहे जे काम पूर्वी सहायक अभियंता करत असे.
ह्या सगळ्या कथा केवळ भविष्यातल्या नाहीत तर काही कथा आताच्या काळातल्यादेखील आहेत. विज्ञानातील संकल्पना उपयोगात आणून कसे गुन्हे घडू शकतात आणि विज्ञानाचीच मदत घेऊन गुन्हे घडणे कसे थांबवता येऊ शकते हे सूत्र धरूनही खूप रंजक कथा आहेत. मोठ्यांबरोबरच विद्यार्थ्यांना पण ह्या कथा निश्चित आवडतील. ह्या कथांचे शाळेत किंवा इतर कार्यक्रमातही अभिवाचन केले तर मला वाटतं बरेच विद्यार्थी, युवक पुन्हा वाचनाकडे उत्सुकतेने वळतील.
लेखकाने हे पुस्तक डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर ह्यांना मोठ्या प्रेमाने अर्पण केले आहे. त्यात लिहिले आहे.... *लहानपणी लायब्ररीतून आणून एकामागोमाग एक फडशा पाडलेल्या तुमच्या उन्हाळी सुट्ट्या समृद्ध झाल्या !*
क्षितिजने लिहिलेली पुस्तके वाचून पुढे अशीच पोचपावती त्याला आताच्या लहान मुलांकडून मिळावी अशा शुभेच्छा क्षितिजला देते.
श्रेया राजवाडे
पुस्तकांच्या गोष्टी | ३० मे २०२६
भविष्यातील जगाचं भन्नाट दर्शन घडवणाऱ्या फ्रेश विज्ञानकथा : शीतपेटीतून जेव्हा जाग येते
साधारणपणे चाळीस एक वर्षांपूर्वी, ९ वी - १० वी मध्ये असताना विज्ञान कथा या अनोख्या, आकर्षक आणि गुंग करून टाकणाऱ्या साहित्य प्रकाराची ओळख झाली. हे काहीतरी अफलातून प्रकरण आहे इतकंच तेव्हा जाणवलं होतं. मग निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे, डॉ. बाळ फोंडके, आणि अर्थातच डॉ. जयंत नारळीकर यांच्या कथा - कादंबऱ्यांची पारायणं सुरू झाली. मराठीत आणखी कोण कोण या रिंगणात आहे हे शोधल्यावर यशवंत रांजणकर, द. पां. खांबेटे आणि चक्क नारायण धारप ही नावंही जोडली गेली. एका अद्भुत जगाचं, भविष्यातल्या मानवी व्यवहारांचं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनोख्या समस्यांचं दर्शन घडवणाऱ्या गोष्टी म्हणून विज्ञान कथांनी मनात घर केलं ते कायमचंच. त्यामुळे दरवर्षी नवल, धनंजय मधल्या विज्ञान कथा शोधून शोधून वाचणं सुरू झालं. इंग्रजी वाचन सुरू झाल्यावर आर्थर सी क्लर्क आणि आयझॅक असिमोव्ह वाचणं अनिवार्यच होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर क्षितिज देसाई या तरुण - तडफदार इ. इ. लेखकाचा ' शीतपेटीतून जेव्हा जाग येते ' हा नवा कोरा विज्ञान कथा संग्रह हातात घेताना एक वेगळीच उत्सुकता, अधिरता मनात होती. तुलनेनं नवीन असलेल्या या लेखकाचं इतर काही वाचलेलं नव्हतं आणि लाडक्या विज्ञान कथांचा संग्रह असल्याने काय लिहिलंय तरी काय यानं? असा उगाचच एक तिरका कटाक्षही होता. पण पहिल्या दोन कथांमध्येच या अनोळखी लेखकानं बाजी मारली आणि विज्ञान कथांचं अंगणं त्याचंच आहे याची जोरदार खात्री पटवली.कथा संग्रह हातात घेताना जरा अनोळखी असणारा लेखक कथा वाचायला सुरुवात केल्यावर मग एकदम जुन्या ओळखीचा होऊन गेला. पठ्ठ्यानं मराठी विज्ञान कथांचा होमवर्क मन लावून केल्याची चुणूक त्याच्या कथांमध्ये जागोजागी दिसते. त्यात भारत यंत्रमानव निर्माण समूहाच्या दरवाज्यात निरंजन घाटेंचा पुतळा असं वाचल्यावर तर लेखकाविषयी फारच आपलेपणा वाटू लागतो.
विज्ञान कथा म्हणजे फक्त वैज्ञानिक संकल्पना, सिध्दांतांवरच आधारित कथा नव्हेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी आयुष्याच्या जगण्याचा भाग झाल्यामुळे ज्या नैतिक, भावनिक, व्यावहारिक समस्या निर्माण होऊ शकतात त्यांची झलक विज्ञान कथांमधून दिसली पाहिजे. तशी ती या संग्रहातील कथांमध्ये सहजगत्या दिसते. आज आपण ए आय अर्थात कृत्रिम प्रज्ञेच्या आरंभीच्या काळात चाचपडत आहोत, भविष्यात तीच पूर्ण विकसित झाली असेल तेव्हा मानवी आयुष्य कसं असेल अधिक सुखदायक का अधिक गुंतागुंतीमुळे त्रासदायक? यंत्र मानवात बुद्धिमत्ता भरता येते पण भावनांचं काय? भावना विरहित बुध्दिमत्ता घातक का उपयुक्त? अशा अनेक मुद्यांना या संग्रहातील कथा स्पर्श करतात .
भविष्यातील कथा असल्यामुळे मग ' मार्स सर्व्हिस कमिशनची परिक्षा ' , 'नॅनो सूट घालून टाइम व्हॅन मधून केलेला कालप्रवास ' , ' क्रायोजेनिक स्लीप अर्थात दीर्घ काळासाठी नियंत्रित निद्रा ' , ए आयचे न्यायाधीश ' , ' रोबो नॅप अर्थात यंत्रमानवांचे खंडणीसाठी अपहरण ' , चेसच्या खेळात जिंकायला मदत करणारा बुद्धिमान चष्मा ' अशा अनेक रंजक, चकीत करणाऱ्या पण कथानकाचा भाग म्हणून आलेल्या गोष्टींमुळे या कथांची वाचनीयता वाढली आहे. शीतपेटीतून जाग येते तेव्हा आणि ए आय विरुद्ध विक्रांत या कथांमधून भविष्यातही जेव्हा तंत्रज्ञान अतिप्रगत झालं असेल , कृत्रिम बुद्धिमत्ता तेज बनली असेल तेव्हा ही मानवी बुध्दिमत्ताच भारी ठरेल याचं चित्र लेखकाने रेखाटून जणू दिलासाच दिला आहे. इंडेक्स पेशंट ही कथा एखाद्या अॕक्शन थ्रीलरसारखी आहे. हे कथा बिज आणखी फुलवून उत्तम कादंबरी होऊ शकते. गैर मार्गाने भूतकाळात घुसलेल्या टाइम क्रिमिनलचा पाठलाग आणि शेवटी मिळालेली धक्कादायक कलाटणी यामुळे ही कथा अतिशय उत्कंठावर्धक झाली आहे. ओरीगामीचं ओबडधोबड ऑर्किड या कथेचा गाभा तसा परिचित आहे, यंत्रमानवांना भावना असल्या तर ??? हा पैलू नवीन नसला तरी या कथेचा शेवट वाचताना गलबलायला होतं हे नक्की.
क्षितिज देसाई मुळे मराठी विज्ञान कथेची पालखी परंपरेला साजेशा सशक्त लेखणीने उचलली आहे याची खात्री पटते. भविष्यातील मानवी जीवन, समाज आणि विज्ञान- तंत्रज्ञान यातील नातेसंबंध नेमका कसा असेल याचं मनोज्ञ दर्शन या कथा घडवतात. तेव्हा शीतपेटीतून जेव्हा जाग येते.. हा सृजन संवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेला विज्ञान कथा संग्रह अवश्य वाचा.
जाता जाता : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे तर्फे कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड झाली आहे. १ जून २०२६ रोजी लेखक क्षितीज देसाई यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.
मकरंद जोशी
दैनिक नंदीग्राम | ०२ जुलै २०२६
कल्पितावर विश्वास ठेवायला लावणारा विज्ञान कथासंग्रह.... शीतपेटीतून जेव्हा जाग येते...
वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असा आरोप ज्यांच्यावर होतो अशा आजच्या तरुणाईला सुद्धा आपल्याकडे खेचून घेईल अशी ताकद क्षितिज देसाई यांच्या लेखनात नक्कीच आहे. या तरुण लेखकाचा शीतपेटीतून जेव्हा जाग येते नावाचा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे आणि त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.
विज्ञान कथा म्हणलं की बोजड, रूक्ष, कंटाळवाण्या असतात किंवा मग तांत्रिक शब्दांचा भडिमार तरी असतो असा अनेक वाचकांचा समज आहे पण तो गैरसमज आहे हे हे पुस्तक सिद्ध करते. मी स्वतः मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये एम. फिल. केले आहे. अर्थात ही जुनी गोष्ट आहे. सध्या मी साहित्याकडे वळले आहे. साहित्याचे शिक्षण आणि लेखन दोन्ही चालू आहे. मुळातच विज्ञान कथा/ कादंबरी वाचायला मला खूप आवडतं. जयंत नारळीकर, बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे आणि सध्याच्या मेघश्री दळवी, असीम चाफळकर यांना वाचायला मला खूप आवडतं. पूर्वी एका विज्ञान कथा लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी जयंत नारळीकर सर आले होते तेंव्हा विज्ञान कथा कशा असाव्यात आणि कशा नसाव्यात यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. मला वाटते विज्ञान कथा कशा असाव्यात हे क्षितिज देसाई यांचे पुस्तक वाचून आपल्याला नक्कीच कळेल.
एकूण आठ कथा असलेला हा कथासंग्रह सृजनसंवाद प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
लहानपणी लायब्ररीतून अनेक पुस्तके आणून, वाचून आपल्या उन्हाळी सुट्ट्या समृद्ध झाल्या असे लेखकाने सांगितले आहे. मला वाटते त्यामुळेच ते उत्तम लेखक आहेत. कारण एक उत्तम वाचकच उत्तम लेखक होऊ शकतो.
काळ आणि अवकाश यांची व्यापक जाणीव करून देत, वेगळ्याच आयामामध्ये त्यांना गुंफणाऱ्या या कथा आहेत. बंडखोरी, प्रयोगशीलता आणि अचाट कल्पना ही त्यांची वैशिष्ट्ये मानता येतील. या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेमध्ये एक अनाकलनीय गुंता आहे. आपल्या जीवनातही असेच अनेक सूक्ष्म गुंते असतात. कथेमधल्या गुंत्याची सकारात्मक उकल लेखकाने केली आहे.
शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथेवर आधारित मुखपृष्ठ आहे. कथा वाचल्यानंतर त्याचा संदर्भ लक्षात येतो. मुखपृष्ठ अतिशय कल्पकतेने डिझाईन करण्यात आले आहे.
क्षितिज देसाई आपल्या मनोगतात लिहितात की आपण निर्माण केलेल्या कल्पितावर कोणीतरी विश्वास ठेवतं, कोणीतरी त्या जगाचा भाग होतं ही भावनाच किती सुखद आहे! हे अगदी खरं आहे. पुस्तक वाचत असताना आपण त्या जगात नकळतपणे हरवून जातो. आपण कधी मंगळावर जातो ; यंत्रमानवांच्या जगात जातो; टाईम व्हॅन मध्ये बसतो; क्रायोजनिक स्लीप मधील माणसाची कथा वाचत असताना आपणही त्या जगाचा एक भाग होऊन जातो. लेखकाची शैली चित्रदर्शी आहे. वाचत असताना जणू काही ते यंत्रमानव आपल्यासमोर उभे आहेत असं वाटतं. कधी आपण टाईम व्हॅन मध्ये बसून मागे येतो तर कधी 100 वर्षांनी पुढे जातो. कथेचा काळ कोणताही असू द्या पण जीवनमूल्यांशी कुठेही तडजोड या कथासंग्रहात दिसत नाही. अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित कथा सुद्धा यामध्ये आहे. गुंता कितीही अनाकलनीय असला तरीही तो सोडवताना माणुसकी आणि जीवनमुल्यंच जिंकतात.
ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्किड वाचताना यंत्रमानवात सुद्धा आपल्याला मानवाचा भास व्हायला लागतो आणि मानवी भावना जाणवायला लागतात.
बुद्धी विरुद्ध बळ या कथेत सुद्धा असंच विज्ञानाच्या मदतीने प्रामाणिकपणा जिंकतो.
या पुस्तकाविषयी मी लिहीत असताना कुठल्याही कथेबद्दल जास्त डिटेल्स दिले नाहीत कारण पुस्तक वाचण्यात जी मजा आहे ती मला घालवायची नाही.
लेखक स्वतः बी.ई. कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यामुळे काॅम्प्युटरशी संबंधित अनेक तांत्रिक गोष्टी किंवा संज्ञा कथेमध्ये येतात. ज्यांना त्या विषयी काहीच माहीत नाही त्यांना सुद्धा ही कथा वाचताना त्यांचा अडथळा होत नाही हे लेखकाचे खूप मोठे यश आहे. कारण काही ठिकाणी अगदी सोप्या भाषेत ते सांगितले आहे तर काही ठिकाणी कथा वाचताना आपोआप आपण पुढे जातो आणि आपल्याला त्याचा अर्थ समजायला लागतो.
या पुस्तकाला पाठराखण सुप्रसिद्ध विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी लिहिली आहे. त्यामध्ये लेखकाचे कौतुक करताना ते म्हणतात की मानव आणि यंत्रमानव एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाने सुखसोयींची परमावधी गाठली आहे. पण माणसातील हीन प्रवृत्तींवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. लेखकाचे लेखन आपल्याला स्तिमित करता करता माणसांमधल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती मधील चिरंतन झगड्याची जाणीव करून देत आपल्याला विचार करायला भाग पाडतं, अंतर्मुख करतं.
माणूस हा गोष्टीवेल्हाळ असतो. त्याला कथा वाचायला खूप आवडतं. आपल्याकडे शाळेत विज्ञान शिकवणं म्हणजे फक्त व्याख्या तोंडपाठ करणं, आकृती काढण्याचा सराव करणं, आणि कार्यकारणभाव दर्शविणारी उत्तरे तोंडपाठ करणं एवढंच आहे. त्याचा अर्थ सांगायची तसदी फारशी कोणी घेत नाही. लेखकाने अशा कुमार वयातील मुलांसाठी सुद्धा बालविज्ञान कथा आवर्जून लिहाव्यात असे मला वाटते.
विज्ञानकथा फक्त विज्ञानाच्या लोकांनीच वाचायच्या असतात का? असं अजिबात नाही. म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक साहित्याच्या महाविद्यालयीन स्तराच्या शिक्षणक्रमात लावायला हवं. विज्ञानातही कल्पनेची भरारी कशी मारता येते आणि वाचकाला खेचून घेणारं लेखन कसं करता येतं हे त्यांना शिकवणं आवश्यक आहे.
लेखकाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अश्विनी निवर्गी
फेसबुक | ३१ जानेवारी २०२६
चालू काळाचा पसारा समजून घेऊन येणाऱ्या शेकडो वर्षांचा वेध घेताना, कुठेही अतिशयोक्तीचा भास होऊ न देण्याची काळजी घेत, वाचकाला भविष्याच्या कल्पना विश्वातही खरेपणाचा आनंद, अनुभव देण्याची ताकद असलेला एक जबरदस्त विज्ञान कथासंग्रह म्हणजे क्षितिजचा "शीतपेटीतून जेव्हा जाग येते.. हा होय.
पहिल्याच परिच्छेदापासून आता पुढे काय? या उत्सुकतेने अधाश्यासारखं हे पुस्तक, वाचक म्हणून तुम्हाला पुढे पुढे ओढत नेतं. दोन वेळा हे पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर लिहावं असं मला वाटलं, कारण यातला काळ, त्यात वापरलेली विज्ञानाची प्रगत भाषा, साधनं ही नीट समजून घेतली तरच वाचक म्हणून मी यावर लिहू शकेन असं वाटत होतं. या पुस्तकातल्या आठ कथा तुम्हाला 8 चित्रपटासारख्या नक्कीच भासतात. पहिल्या कथेतली नायिका मंगळावर शासकीय अधिकारी म्हणून रुजू होत असताना, विज्ञानाच्या कुठल्या कुठल्या चाचण्यातून जाते? आणि यातून ती एक अभ्रष्ट अधिकारी म्हणून कशी वेगळी ठरते, हा सध्य भ्रष्ट व्यवस्थेत भेडसावणारा कळीचा मुद्दा लेखक आपल्या पहिल्या 'ब्लू बेरीचं ब्रेसलेट' या कथेतून आपल्यापर्यंत अगदी सहज पोहचवतो.
माणसाने कितीही प्रगती केली तरी भावनिक नाती जपत समाजात प्रेम, करुणा जपली पाहिजे. भविष्यात रोबो वापर वाढत गेल्यावर त्या रोबोंचा वापर कसा आणि कुठे कुठे केला जाईल, याचा आपल्याला अंदाज करून देणाऱ्या या दुसऱ्या कथेत, माणूस विज्ञानाचा वापर करत असताना आपलं भावनिक मन मारून टाकेल की काय या भीतीचा अंदाज 'ओरिगामीचं ओबडधोबड ऑर्कीड' या कथेतून दिल्याचं जाणवलं. या कथेचा शेवट माणूस म्हणून मनाला चटका लावून जातो.
यापुढील कथा आणखीन कल्पनांचा आणि विज्ञानाचा अविष्कार आपल्या समोर ठेवत असतानाच, आपल्याला विचार करायलाही लावतात. यात रोबोंचं अपहरण, एका काळातून दुसऱ्या काळात जाणाऱ्या विज्ञानाच्या गोष्टी ( टाईम ट्रॅव्हल), ज्यात वेगवेगळे पर्याय मांडत असताना कुठेही 'अति आहे हे' असं जाणवलं नसल्याने, असंही असू शकतं हे मनाला पटत जातं. अंधश्रध्देचा विज्ञानाच्या आधारे उलगडा हा कथेचा विषय विचार करायला लावणारा आहे आणि समाज प्रबोधनाचं काम करणारा आहे.
यातली 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते.. ' ही कथा मात्र तुम्हाला अचंबित करून टाकणारी आहे. मेंदूत असलेल्या आठवणींचा साठा अदलाबदली झाला तर काय होईल?, तुमचं शरीर वेगळं आणि तुमच्या आठवणी वेगळ्या याने काय-काय गडबड होईल आणि ती दुरुस्त होणारच नाही असं सांगितल्यावर तुमच्या डोक्यात नक्की काय येतं आणि हे दुरुस्त करण्यासाठी या कथेतला नायक नक्की काय करतो? सरतेशेवटी हे दुरुस्त करण्यात त्याला यश येतं का? हे सगळं नक्की कसं घडतं याचं अगदी वेगळ्या पद्धतीने लेखकाने आपल्यसमोर मांडलंय, त्यामुळे ही कथा नक्कीच वाचावी आणि ही वाचून झाल्यावर आपण स्वतःला कितीही थांबवलंत तरीही या कथेच्या प्रसंगावर विचार करायला आपण स्वतःला मात्र थांबवू शकत नाही.
क्षितिजला मागील काही वर्षांपासून मी ओळखतो, दिसताना अगदी शांत, बोलतानाही तितकाच तो शांत असतो, पण या शांत माणसाच्या डोक्यात जे काही विज्ञानाचं वादळ घोंगावत असतं, याचा अंदाज घ्यायचा असेल तर त्याचे 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' आणि 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' हे विज्ञान कथासंग्रह नक्कीच वाचा. वाचकाच्या मेंदूला चालना आणि एका वेगळ्या विश्वात नक्कीच घेऊन जातात.
दीपेश मोहिते
कौशिक लेले ब्लॉग | १५ जानेवारी २०२६
मराठीतून चांगल्या विज्ञानकथा किंवा कल्पनारंजन(फँटसी) प्रकारचं लेखन इतर साहित्यप्रकारांइतकं मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. त्यामुळे मराठीत असं लेखन दिसलं तर मी मुद्दामून वाचायचा प्रयत्न करतो. विशेषतः त्यात नवीन लेखकाचं नाव दिसलं तर ह्या लेखकाने काय वेगळे प्रयोग केले असतील ह्याची जास्त उत्सुकता वाटते. त्यामुळे क्षितिज देसाई हे मला अनोळखी नाव आणि त्याचा विज्ञानकथा संग्रह ह्याबद्दल फेसबुक पोस्ट्स बघितल्यावर पुस्तक लगेच विकत घेतले. आवडलेही. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार कळले की क्षितिज च्या कथा २०११ पासून प्रकाशित होतायत. हा त्याचा दुसरा कथासंग्रह आहे.
पुस्तकात नऊ कथा आहेत. भविष्यात विज्ञान – तंत्रज्ञान ह्यांच्या प्रगतीने आपल्या जगण्यात काय बदल घडतील, त्यातून काय नवीन समस्या तयार होतील, त्यावरचे उपाय पण कसे अभिनव असतील ह्याची कल्पना करणाऱ्या ह्या कथा आहेत.
ह्या नऊ कथा आपल्याला आजच्या काळापासून दूर भविष्यापर्यंत, घरापासून मंगळापर्यंत, बुद्धिबळाच्या पटापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटापर्यंत, यंत्रमानवांच्या भावभावनांपासून भविष्यात जाग्या झालेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या भावनांपर्यंत सफर घडवून आणतात. आपण त्या सफरीचा समरसून आनंद घेतो. शेवटच्या दोन कथांमध्ये दाखवलेली फसवणूक कदाचित आजही घडू शकेल असं तंत्रज्ञान आसपास आहे. त्यामुळे कल्पना किती झपाट्याने सत्य होतायत ह्याची जाणीव होते. म्हणून इतर कथांमधले तंत्रज्ञान आत्ता उपलब्ध नसलं तरी या कल्पना शक्यतेच्या टप्प्यात आहेत असं आपल्याला वाटतं. त्यातून या गोष्टी अतर्क्य वाटत नाहीत. खरंच असं होऊ शकतं असा विश्वास वाचकाच्या मनात निर्माण करतात. असं झालं तर काय काय होईल याबद्दल वाचकांनाही विचार प्रवृत्त करतात.
मुख्य कल्पनेच्या गाभ्याप्रमाणेच कथांची लेखनशैलीही दृश्यात्मक आहे . कमीत कमी वर्णनात लेखक परिस्थिती आपल्यासमोर उभी करतो. अनावश्यक वर्णनाचा फापटपसारा मांडलेला नाही. निवेदन व संवाद असं दोन्ही वापरलेलं आहे त्यामुळे कथा एकसुरी होत नाही. योग्य तिथे इंग्रजी व मराठी शब्द वापरून तोही मेळ चांगला साधला आहे. प्रसंगही वेगवान घडतात आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. एक कथा वाचून झाली की लगेच पुढची वाचायची इच्छा निर्माण होते. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवलंत तर नवल नाही.
क्षितिज देसाई २०११ पासून विज्ञानकथालेखन करतो आहे. आता त्याच्या इतर गोष्टी वाचायची उत्सुकता आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा कळलं की तोही मूळचा डोंबिवलीकर आहे. माझा गाववाला! त्यातही आयटी क्षेत्रात काम करणारा. त्यामुळे कौतुक अजूनच वाढले. क्षितिजच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! क्षितिजच्या लेखनाने मराठी विज्ञानकथांचे क्षितिज कायम उजळत राहो!
मी दिलेली पुस्तक श्रेणी - आवा ( आवर्जून वाचा )
कौशिक लेले
फेसबुक | १८ डिसेंबर २०२५
"विज्ञान तंत्रज्ञानाची भरधाव प्रगती होत असताना, त्यातून बरेच नैतिक, सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातल्या गुंतागुंतीची उकल मोठमोठ्या विद्वत्तापूर्ण निबंधाच्या साह्याने केलीही जात असते, पण सर्वसाधारण वाचकाला या प्रश्नांची माहिती होण्याचे कार्य अहेतुकपणे का होईना विज्ञानकथेच्या सहाय्यानं होऊ शकतं. असं मला वाटते. " - निरंजन घाटे
वरील ओळींची प्रचिती मला आली ती Kshitij Desai चं नवकोरं विज्ञानकथा संग्रह " शीतपेटीतून जेव्हा जाग येते" या पुस्तकातून. 2023 साली क्षितिजचा 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा विज्ञान कथासंग्रह वाचला होता. किशोरांसाठी लिहिलेल्या कथा असून सुद्धा प्रौढांना आवडतील अशा होत्या. त्यातल्या दोन कथा तर मला खूप भावल्या 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' आणि 'माझा पॅराडॉक्स'. तसेच 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते ' या संग्रहातील आठही विज्ञानकथा तितक्याच वैविध्यपूर्ण आणि रोचक आहेत. मला स्वतःला गूढकथा हा प्रकार खूप आवडतो. त्याच कारण म्हणजे त्यात अंतर्भूत असलेले धक्कातंत्र . वाचकाला गाफिल ठेऊन एका बिंदूवर कथेत ट्विस्ट आणायचा आणि गोष्टीचा शेवट करायचा . गूढकथा वाचताना एक वाचक पहिल्या ओळीपासून कथेच्या शेवटी काय घडणार असेल याचा अंदाज बांधत असतो. मात्र लेखक एका बिंदूवर वाचकाने बांधलेले आडाखे खोटे ठरवत एक रोमांचकारी अनुभव देत गोष्ट संपवतो. विज्ञानकथा सुद्धा याच अंगाने जातात असं मला वाटतं. क्षितिजच्या या नव्या कथासंग्रहातील सर्व कथा रोमांचकारी अनुभव वाचकाला देतात. या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. या आठही कथा वैविध्यपूर्ण आहेत. सर्व कथांचा प्लॉट आणि थीम हा एक दुसऱ्यापासून संपूर्णतः वेगळा असून कुठेही या कथांमध्ये एकसुरीपणा आलेला नाही. विज्ञान कथा लिहणे हे लेखकासाठी सुद्धा थोडे आव्हानात्मक होत असावं असे मला वाटते. कारण त्या कथानकाला साजेशी पार्श्वभूमी आणि terminology ही लेखकाला स्वतः रचावी लागते. विशेषकरून भविष्यातला प्लॉट असेल तर तेव्हा जग कसे असेल याची कल्पना करून वाचकाला पटेल, रुचेल अशा गोष्टींचा अंतर्भाव कथानकात करावा लागतो. क्षितिज आपल्या कथांत ते करण्यात यशस्वी झालाय. क्षितिजाच्या कथांत तत्कालीन जगाच्या गोष्टी बेमालूमपणे कथानकात एकरूप होऊन पुढे येतात. वाचकाला कथेच्या प्लॉट साठी खूप सारे तपशील देऊन नंतर मुख्यकथानक सांगण्याचा प्रयत्न कुठेही दिसत नाही.
विज्ञान हे मानवी जीवन अधिकाधिक सुखकर व्हावे आणि अखिल मानव जातीच्या हिताला प्राधान्य मिळावे अशी एक माफक अपेक्षा विज्ञानाकडून केली जाते. परंतु विज्ञान जर चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर ते मानवजातीला अपायकारक ठरले आहे याची अनेक उदाहरणे आजवर जगाने पाहिली आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपिय राष्ट्रांनी इतर राष्ट्रांवर केलेली हुकूमत असो , दोन विश्वयुद्धांनी समस्त मानव जातीचे केलेले नुकसान असो किंवा गर्भलिंगनिदान करून लाखो मुली जगात येण्या आधी त्यांची केलेली हत्या असो. या मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी विज्ञानाशिवाय शक्य झाल्या नसत्या. परंतु यात विज्ञानाचा दोष नसून त्याचा वापर करणाऱ्या माणसांच्या कलुशीत महत्त्वकांक्षेत आहे. जग कितीही बदललं तरी नैतिकता आणि माणुसकी ही मूल्ये शाश्वत आहेत आणि ही मूल्ये माणसे सतत तेवत ठेवतील असा आशावाद या कथांतून दिसतो. कथनात कुठे छोटे- छोटे विनोद पेरले आहेत. त्यात MPSC चा फुलफॉर्म, रोबोनॅप सारखा नवीन शब्द, कियान जेव्हा म्हणतो "बर झालं रिसेप्शनिष्ट च्या जागी AI नाही ठेवलं " आणि त्यावर रिसेप्शनिष्ट चे उत्तर, काही ठिकाणी उत्तम असे विनोद effortlessly आले आहेत. तर एका प्रसंगात भावनिक व्हायला झालं. जास्त लिहलं तर spoilers मिळतील. म्हणून या गोष्टींच्या तपशिलात जाणार नाही.
Modern problems require modern solutions म्हणतात. या विज्ञानकथा आधुनिक/भविष्यकालीन समस्यांवर तितकेच आधुनिक उपाय शोधू पाहतात. या कथासंग्रहात भविष्यकालीन घटना आहेत, रोबो आहेत, AI आहे, आधुनिक गॅजेट्स आहे, हातचलाखी चे उदाहरण आहे, बुवाबाजी आहे, भूत-भविष्य -वर्तमानात लिलया मुशाफिरी आहेत. पण सर्वात महत्वाच म्हणजे या उत्तम कथा आहेत. यातली एक कथा तर काय नैतिक काय अनैतिक हे ठरवने वाचकांवर सोपवून देते. 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' संग्रहात ऋजुता हे पात्र आहे, इथे सुद्धा दोन कथांमध्ये ऋजुता आपल्याला परत भेटते. पुढील संग्रहात कियान, इरा, विक्रांत, अरभाची () सुद्धा भेटतील अशी आशा करतो.
सृजनसंवाद प्रकाशनाने एक देखणे पुस्तक आपल्या पर्यंत आणले आहे आणि ते तितकंच लवकर वाचकापर्यंत पोचेल याची काळजी ते घेतात त्या साठी त्यांचे आभार. मुखपृष्ठ आणि अंतर्गत रेखाचित्रे छान जमून आली आहेत. कथा वाचण्याआधी क्षणभर थांबून त्या रेखाचित्रांचे निरीक्षण करण्याचा मोह आवरला नाही मला.
क्षितिज च्या या नव्या दर्जेदार पुस्तकाने माझ्या छोट्या विज्ञानकथासंग्रहात भर पडली आहे. भविष्यात क्षितिज अशाच आणखी नव्या कथा घेऊन येईल याबाबतीत मी निश्चिंत आहे. पुस्तक प्रकाशन समारंभाला इच्छा असूनही येऊ शकलो नाही याची खंत आहे पण पुढच्या वेळी नक्की येईन आणि नवीन पुस्तक आणण्याची घाई क्षितिज करेल अशी आशा आहे. काय माहित एखाद टाईम ट्रॅव्हल गॅजेट् मिळाला तर टाईम ट्रॅव्हल करून मिस झालेला कार्यक्रम परत अटेंडही करता येईल .
प्रशांत येगोलपवार
फेसबुक | २५ डिसेंबर २०२५
#वाचनवेडा चे Vinamra Bhabal यांनी या पुस्तकाची पोस्ट टाकली तेव्हाच या पुस्तकाच्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली.काल्पनिक त्यात विज्ञानावर आधारित कथा,हा तर माझा आवडीचा विषय.अशा कथांमध्ये कल्पनाशक्तीचा जोर लावलेला असतो,आणि वाचकांची सुद्धा एक मनोरंजक सफर घडून येते.त्यामुळे लगेच पुस्तक मागवले.पुस्तक वाचून झाल्यावर एकच अनुभव आहे,तो म्हणजे कमाल!
पुस्तकात एकूण आठ काल्पनिक विज्ञान कथा आहेत,आणि सर्वच अद्भुतच्या रेंजमधल्या.प्रत्येक कथा वाचताना माणूस गुंतून जातो आणि शेवटचे ट्विस्ट वाचून अचंबित होतो.आजच्या युगात ज्या वैज्ञानिक संकल्पना (टाइम ट्रॅवल,AI,रोबोटिक्स,अंतराळ सफर इत्यादि) काल्पनिक वाटतात,त्या भविष्यात पूर्ण झाल्या तर?या गोष्टीचा विचार करून या कथा रचलेल्या आहेत.
त्याचबरोबर मला आवडलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ट बोलके आहेच पण प्रत्येक कथेच्या आधी येणारी रेखाचित्रेही छान आहेत.
कथा फार मोठ्या नाही आणि छोट्याही नाहीत.त्यामुळे काहींच्या एका बैठकीत वाचून सुद्धा होतील.अशा कथा लिहिणे म्हणजे कल्पनाशक्तीचा कस आहे.भविष्य काळातील घटनांची कल्पना करून त्यावर आधारित रंजक कथा लिहिणे सोप्पी गोष्ट नव्हे,त्याबद्दल लेखाकाचे कौतुक करावे तेवढे कमीच.ज्याचे विज्ञानाचे बेसिक्स क्लियर आहेत,ज्याला अतिशय रस आहे,आणि या बद्दलचा अभ्यासही चोखंदळ आहे,तोच अशा कथा रचू शकतो.
ज्यांना वैज्ञानिक कथा वाचायला आवडतात,त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे.
लेखकाला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
संकल्प अभ्यंकर
चित्राक्षरे | १ मार्च २०२३
विज्ञान कथा अजूनपर्यंत कधीच वाचल्या नव्हत्या. अर्थात आपला एक कल असतो त्यानुसार आपण वाचत जातो. मागील आठवड्यात 'सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस' हा क्षितीज देसाई लिखित कथासंग्रह वाचला आणि आपण आपल्या कलाच्या पलिकडे जाणं हे ही किती आनंददायी असू शकतं हे समजलं!
नवोदितांचं वाचण्यात इंटरेस्ट असतो. पुस्तकाचं नावही इंटरेस्टिंग आणि कुतूहल चाळवणारं वाटलं. कथासंग्रह मागवला आणि वाचायला सुरुवात केली तर वाचतंच गेलो. हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता.
पहिलीच शीर्षक कथा मला भन्नाट आवडली! ही काही हजार वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आहे. एका स्वप्नाळू आणि धडपड्या तरूणाची ही गोष्ट. यातला निवेदक त्याकाळातील एक छोटा मुलगा आहे. त्या काळातील भाषा अर्थात वेगळी असणार मग लेखकाने वर्तमानातल्या वाचकाला समोर ठेऊन परंतू त्या काळालाही न्याय देऊन जे शब्द बनवले आहेत ते खास आहेत. त्यासाठीची लेखकाची मेहनत दिसून येते. कथानक सुंदर आहे!
पुढच्या 'बोका बोले तो', 'तुझो माझो पिझो', गळ्यात साखळी सोन्याची', चोराच्या मनात चेक इन' चार कथा या विज्ञान कथा आणि शोध कथा यांचं मिश्रण आहे. एक तरुण पोलीस आणि त्याला मदत करणारी कॉलेज तरूणी, हे दोघे मिळून गावातील वेगवेगळ्या चोर्या करणार्या चोरांना कशाप्रकारे पकडतात? असं कथानक आहे. 'माझा पॅराडॉक्स' ही कथा टाईम ट्रॅव्हल या कन्सेप्ट वर आधारित आहे. कथेचा प्लॉट मस्त आहे. मला ही कथा वाचताना डार्क या सिरीजची आठवण आली. 'म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे' या कथेत थ्रिल हा एलिमेंट आहे! वाघांवर प्रयोग करणारा एक संशोधक साथी संशोधकाचा सूड घेण्यासाठी कोणत्या थराला जातो आणि त्यातून कोणतं संकट उभं राहतं हे या कथेत येतं. 'काळ थांबत नाही' याचं कथाबीज खूप छान आहे. भुतकाळात जाऊन एका संशोधकाच्या धारणा तो संशोधक होण्याआधीच बदलायच्या आणि त्याला त्याच्या संशोधनापासून दूर ठेवायचं यासाठी एक तरुण आणि तरुणी प्रयत्नशील आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतो का? हे कथा वाचल्यावर समजेल. शेवटच्या 'माय' भुमी या कथेत पृथ्वीचं भविष्य आणि त्या अनुषंगाने घडणारी स्थित्यंतरं आणि एका तरुण संशोधिकेने तिच्या आयुष्यात यासंदर्भात घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असं कथानक आहे.
यातील आठही कथा लघुकथा आहेत. कथा सुटसुटीत, समजायला सोप्या आहेत. परंतू त्या कंटाळवाण्या होत नाहीत. प्रसंग, संवाद हे अटोपशीर आहेत. भाषा साधी सिंपल पण वाचणार्याला एंगेज ठेवणारी आहे. कथानकं अधिक गुंतागुंतीची असती तर आणखी मजा आली असती असं वाटलं.
मानवी आयुष्यातील विज्ञानाचं महत्त्व या कथांमधून अधोरेखित झालं आहे. पहिलीच कथा विज्ञानामुळे मानव कसा 'पुढे गेला' हे मांडते. इतर कथांमध्ये माणूस त्याच्या विवेकानुसार विज्ञानचा वापर कसा चांगल्या वाईट प्रकारे करू शकतो/करतो ते दिसतं त्याचबरोबर निसर्ग, पर्यावरण यांच्या संवर्धनाचं भान शेवटच्या कथेत दिसतं!
विज्ञान कथा म्हणून या कथांची गुणवत्ता काय आहे हे मी सांगू शकत नाही. या प्रामुख्याने किशोरवयीन मुलांना समोर ठेऊन लिहिल्या आहेत. पण ब्लर्ब वर म्हंटल्याप्रमाणे या कथा प्रौढांनी वाचल्या तरी ज्ञान आणि आनंद हमखास मिळेल. माझ्याही बाबतीत हेच झालं आहे!
भारत निलख