लेखक- क्षितिज देसाई
प्रकाशन- सृजनसंवाद प्रकाशन, २०२५
क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. या काल्पनिक दुनियेचा क्षितिज देसाई यांनी सादर केलेला देखावा त्यांच्या चित्रदर्शी शैलीपायी वास्तवच वाटायला लागतो, पण त्यानं स्तिमित करता करता ते माणसामधल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील चिरंतन झगड्याची जाणीव करून देत आपल्याला विचार करायला भाग पाडतात; अंतर्मुख करतात.
- डॉ. बाळ फोंडके
२०१९ ते २०२५ या काळात 'छात्र प्रबोधन' मासिकात लिहिलेल्या विज्ञानकथा 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या पुस्तकात संग्रहित केल्या आहेत.
सप्टेंबर २०२५ मध्ये हे पुस्तक उपलब्ध झालं, तर प्रकाशन कार्यक्रम ६ डिसेंबर २०२५ रोजी 'मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे' इथे झाला.
अध्यक्ष: मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह व ज्येष्ठ विज्ञान लेखक अ. पां. देशपांडे.
हस्ते: ज्येष्ठ विज्ञान लेखक कॅप्टन सुनील सुळे.
प्रमुख अतिथी: ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, लेखक डॉ. संजय जोशी,
कवी, अनुवादक, संपादक गीतेश शिंदे.
प्रसिद्ध आर.जे., वृत्तनिवेदक मानसी आमडेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. अनामिक भविष्यातील त्या काळात माणसानं अंतराळात मुक्त विहार करण्याचं कौशल्य साध्य केलं आहे. त्याच्या मदतीनं त्यानं परग्रहांवर वसाहती स्थापन केल्या आहेत. धरतीपासून तिथपर्यंतचा पल्ला कमीत कमी वेळात गाठण्यासाठीच्या वेगवान वाहतूक यंत्रणेची स्थापना केली आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्कासाठी भाषेच्या किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या माध्यमांची गरज उरलेली नाही. मेंदूंची थेट जोडणी आणि तीही कोणत्याही तारांचा किंवा अशाच साधनांचा वापर न करता, विचारांचं आदानप्रदान करत आहे. आहारासाठी अनोख्या पोषणव्यवस्थेची रुजवात केली गेली आहे. आपलं तारुण्य राखून भविष्यात प्रवेश करण्यासाठी शीतपेटीची, हायबरनेशनची सोय झालेली आहे. आपल्याला हव्या त्या काळासाठी त्यात स्वतःला गोठवून घेऊन परत जागं करणं शक्य झालं आहे. यंत्रमानव म्हणजेच रोबो सर्व सेवांसाठी तत्पर आहेत. मानव आणि यंत्रमानव एकमेकांबरोबर गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांचं सहजीवन बहरलेलं आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीनं साकारलेल्या या अनोख्या दुनियेत निसगीनं त्याच्यावर लादलेल्या यच्चयावत शारीरिक आणि भौतिक मर्यादा माणसानं केव्हाच झुगारून दिल्या आहेत. सुखसोईंची परमावधी गाठलेली आहे पण माणसातील हीन प्रवृत्तींवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या त्याच्यावरच्या विळख्यातून सुटका करून घेण्यात तो अपयशीच ठरला आहे. त्यामुळंच याही दुनियेत चोऱ्या होतात, पण संपत्तीच्या किंवा दागदागिन्यांच्या नाही तर संगणकीय कोडच्या. फसवणूक होते, पण तिचं स्वरूप वेगळं आहे. तरीही त्या आहेत चोऱ्याच. चोरून मारून इथंही अनधिकृत कालप्रवास होतो. घुसखोरी होते. याही दुनियेत खंडणीसाठी अपहरण होतं पण ते माणसाचं नसून यंत्रमानवांचं होतं. तेही घाऊक पद्धतीनं. खंडणी रोख पैशाच्या रूपात नाही तर क्रेडिट कॉईन्सच्या स्वरूपात मागितली जाते. आतंकवाद अजूनही बोकाळलेलाच आहे, पण अतिरेकी बाहेरून येत नाहीत सुरक्षा यंत्रणेतील कोणाच्या तरी संगणकीय जुळ्याच्या रूपात घरभेदी बनून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुरक्षा यंत्रणाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना शोधून काढतातच.
या काल्पनिक दुनियेचा क्षितिज देसाई यांनी सादर केलेला देखावा त्यांच्या चित्रदर्शी शैलीपायी वास्तवच वाटायला लागतो, पण त्यानं स्तिमित करता करता ते माणसामधल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील चिरंतन झगड्याची जाणीव करून देत आपल्याला विचार करायला भाग पाडतात; अंतर्मुख करतात.
डॉ. बाळ फोंडके
काही परीक्षणे:
आणखी परीक्षण / अभिप्राय इथे उपलब्ध
दैनिक नवशक्ती, डॉ. संजय जोशी
दैनिक नंदीग्राम, अश्विनी निवर्गी